स्थानबद्धते (Lockdown) मधील पहाट
तसे पाहिले तर पहाट रोजच होते आणि ती रम्यच असते. परंतु लवकर उठून वाहन पकडून कार्यालयात जायच्या घाईत रोज तिच्या रम्यतेचा अनुभव घेता येतोच असे नाही. सध्या आपण सगळे स्थानबद्धतेत असल्याने आवरून कुठे जायचे नाहीये आणि घरून काम करायचे असले तरी प्रवासाचा वेळ वाचतोय. त्यामुळे तात्पर्य असे की आज पहाटे ५ ला जागा झालो तेव्हा या मंगल समयाची अनुभूती घ्यायला सवड होती.
अंधारात सर्वात प्रथम ओरडले ते कोकीळ व कोकिळा. वसंत ऋतू (पाडवा झाला म्हणून असे म्हणायचे - अन्यथा हा कोणता ऋतू आहे हे यावेळी कळतच नाहीये कारण कालच पुण्यात पाऊस पडला!!) सुरु झाल्याचे लक्षण. विणीच्या हंगामातील नराचे सुरेल स्वर व मादीचे कर्कश्श केकाटणे असे दोन्ही प्रकार ऐकायला मिळाले. शहरात इमारतींना खेटून असलेल्या झाडांवर कोकीळचे ओरडणे अंमळ मोठेच वाटते, विशेषतः पहाटेच्या निरव शांततेत.
दुसरा लक्षात आलेला आवाज होता नारद बुलबुलांचा. माझा मेव्हणा याच्या आवाजाचे वर्णन करताना म्हणतो की बुलबुल इंग्रजीतील 'इंटरव्ह्यू' हा शब्द म्हणतोय असे वाटते. मला हे वर्णन मनोनन पटते. शिवाय बुलबुलचे अन्य प्रकारचे आवाजही येत होतेच. तिसरा क्रमांक लावला तांबटने. त्याचा 'पुकपुक' हा सलग येणारा व मधेच थांबून पुन्हा सुरु होणारा आवाज अनेकदा आपल्याला दुपारी ऐकायची सवय असते (अगदी कार्यालयात असलो तरी बाहेर झाडे असतील तर याचा आवाज लक्ष वेधून घेतो.) पण आज पहाटेच या आवाजाने त्याने मला सुप्रभात केले!
मग आकाशातून उडत जाणाऱ्या २-३ पोपटांच्या थव्याचा 'कीकी' असा आवाज आला. पाठोपाठ दयाळची विणीच्या काळातील सुरेल लांबलचक शीळ कानांना सुखावून गेली. पानांना एकत्र शिवून घरटे करणाऱ्या शिंपीने पण 'टोविट टोविट' अशी हजेरी लावली. माझ्या पत्नीने भारद्वाजचा धीरगंभीर आवाजही ऐकला, जो माझ्या श्रवणातून मात्र निसटला. एव्हाना उजाडू लागले होते व स्थानबद्धतेत असले तरी मानवी व्यवहार हळूहळू सुरु होऊ लागले होते. पूर्ण जागे होऊन गादीवर उठून बसताना इवल्याशा सूर्यपक्ष्यांच्या मंजुळ किलकिलाटाने या वाद्यवृंदाची सांगता झाली. असो... आपला स्थानबद्धतेतील हा दिवस मंगलमय जावो......
Comments