 |
दोडामार्ग तालुल्यातील आर्द्र पानझडी जंगल, जिल्हा सिंधुदुर्ग |
आज महाराष्ट्र दिन!
नावातच महा असलेल्या या प्रदेशाला दैदिप्यमान असा सांस्कृतिक, ऐतिहासिक,
साहित्यिक, औद्योगिक व आध्यात्मिक वारसा लाभला आहे.
भारताच्या जडणघडणीत बहुतांश क्षेत्रांत मोलाची कामगिरी महाराष्ट्राकडून होत आलेली
आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात
नैसर्गिक संपत्ती सुद्धा विपुल व वैविध्यपूर्ण आहे. पूर्वी याही पेक्षा समृद्ध
नैसर्गिक ठेवा इथे अस्तित्वात होता असे जुनी सरकारी राजपत्र किंवा शास्त्रीय
अभ्यासकांच्या नोंदी चाळल्या तर लक्षात येते. आजही शिल्लक असलेल्या नैसर्गिक
अधिवासांत जैवविविधता विलक्षण आहे. गेल्या दोन दशकांत केलेल्या भटकंतीत अनुभवलेल्या
वन्यजीवनाचा पट तुमच्यासमोर मी काढलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून मांडतोय.
वन्यप्राण्यांची काही छायाचित्रे जिथे उल्लेख केलाय तेथीलच असतील असे नाही.

चितळ किंवा कांचनमृग - जगातील सर्वात शोभिवंत समजले जाणारे हरीण, जे फक्त भारतीय उपखंडातच आढळते! मला याचे दर्शन बोरीवली, गोरेगाव, मेळघाट व ताडोबा अशा विविध ठिकाणी झाले आहे. सर्वात लक्षात राहील अशी भेट होती ताडोबा मधील जेव्हा साधारण दोन डझन हरणांचा कळप अवचितपणे रस्ता ओलांडून गेला.
बिबट्या, एक अतिशय यशस्वी, संधीचा फायदा करू शकणारा व परिस्थितीशी जुळवून घेणारा शिकारी! सुमारे ७ वर्षांपूर्वी बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या गोरेगाव भागात संध्याकाळी काही सहकाऱ्यांसोबत चालत असताना अचानक वाटेवर समोर साधारण ५० फुटांवर एक उमदा बिबट्या बाजूच्या झाडीतून आला. काही क्षण त्याने आमच्याकडे एक कटाक्ष टाकला व सावकाश उडी मारून दुसऱ्या बाजूच्या झाडीत निघून गेला. सामान्यपणे वन्यप्राणी माणसाच्या वाट्याला जात नाहीत याचा प्रत्यक्ष अनुभव आला.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मी वाघाचे ठसे पाहिले आहेत, तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अनेक वेळा प्रत्यक्ष त्याचे दर्शन झाले आहे. तेथील शुष्क पानझडी जंगल मे महिन्यात अतिशय मोकळे दिसते व वन्यप्राणी सहज दृष्टीस पडतात. उजवीकडे एका पाणवठ्यावर बसलेल्या वाघाकडे आम्ही गाडीतून पाहण्यात तल्लीन झालेलो असताना लक्षात आले की दुसरा वाघ डावीकडून चालत येत आहे, तर तिसरा वाघ मागच्या बाजूने रस्ता ओलांडत आहे.....
अलीकडे पुणे शहरात दोनदा दर्शन झाल्याने गवा चर्चेत आला होता. ताडोबा, मेळघाट व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मी गवे पाहिले आहेत. एकदा कोयनानगर जवळच्या केमसे गावालगत मी स्थानिक धनगर वाटाड्या सोबत रानातून चालत होतो. अचानक घोड्यांच्या टापांसारखा आवाज झाला व एक गव्यांचा कळप काही अंतरावर असलेल्या झाडीतून उठून दूर निघून गेला. त्यात ४ माद्या व २ पिल्ले होती. आमचा वास लागल्याने त्यांनी जागा बदलली होती.
शिंगचोच्या, धनेश, ककणेर, गरुड व माडगरुड अशा विविध नावांनी परिचित असलेल मलबार धनेश मला कोकणात फणसाड, परशुराम, संगमेश्वर, जैतापूर, जयगड, रत्नागिरी, गणपतीपुळे व दोडामार्ग अशा विविध ठिकाणी दिसलाय. एकदा गणपतीपुळे जवळ किनारी महामार्गाने जाताना आमच्या गाडीला समांतर अशा पद्धतीने एक धनेश वरून एखाद मिनिट उडत असल्याचे दृश्य आम्ही पाहिले होते!
काळ्या तुकतुकीत पाठीचे काळवीट नर व भुरकत रंगाच्या माद्या हे दख्खन पठारावरील सामान्य दृश्य असते. मी स्वतः अमरावती परतवाडा रस्ता, शेगाव खामगाव रस्ता, नान्नज व अंबेजोगाई इत्यादी ठिकाणी काळवीट पाहिली आहेत. एकदा अंबेजोगाईतील आद्य कवी मुकुंदराज समाधी मंदिराच्या समोरच्या डोंगर पठारावर काळवीट माद्यांचा एक कळप चरताना दिसला. त्यांचा रंग आसपासच्या सुक्या गवताशी इतका मिळताजुळता होता की नीट निरखून पाहिल्याशिवाय दिसत नव्हत्या.
बैला एवढे उंच असलेले सांबर हे भारतातील सर्वात मोठे हरीण. मला सांबर बोरीवली, गोरेगाव, मेळघाट व ताडोबा या ठिकाणी दिसली आहेत. पण सर्वात लक्षात राहील असा प्रसंग म्हणजे बोरीवली राष्ट्रीय उद्यानात भटकत असताना एकदा बाजूच्या झाडीतून सांबर जोराने ओरडले व दुसऱ्या क्षणी ते वेगाने झाडीतून पळत जात असल्याचे आवाज येऊ लागले. मला पाहून त्याने घाबरून धोक्याची सूचना दिली व त्याच्या जोरात ओरडण्याने मी दचकलो!
महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारे झिपरे अस्वल मी वन्य अवस्थेत पाहिले नाहीये, पण कोयनानगर जवळच्या जंगलात वाटाड्या बरोबर हिंडताना त्याची विष्टा पाहिली होती. तसेच ताडोबाच्या जंगलात पांढरट फिके खोड असलेल्या अर्जुनच्या झाडावर त्याच्या नखांच्या ओरखड्यांनी निर्माण झालेली नक्षी बघायला मजा आली होती. झाडावर असलेल्या पोळ्यांतील मध खाण्यासाठी अस्वल वर चढल्याने असे ओरखडे उमटले होते.
शाश्वत भारतीय संस्कृतीला अनुसरून पर्यावरणस्नेही जीवनशैली अंगीकारून आपण हा ठेवा जतन करायला नक्कीच हातभार लावू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
Comments
आपल्या समृद्ध रानठेव्याची ओळख करून घेतली पाहिजे आणि त्यासाठी जाणकारांबरोबर रानात फिरलं पाहिजे, याची प्रकर्षाने जाणीव झाली.
धन्यवाद!
आपल्या समृद्ध रानठेव्याची ओळख करून घेतली पाहिजे आणि त्यासाठी जाणकारांबरोबर रानात फिरलं पाहिजे, याची प्रकर्षाने जाणीव झाली.
धन्यवाद!