तुकतुकीत कांतीचे काळवीट
--- अतुल
साठे
डोक्यावर इंग्रजी V आकारात सरळ वाढलेली स्क्रू सारखी २ शिंगे व तुकतुकीत
काळी कांती असलेले कुरंग गटातील काळवीट माळरानावर चरताना किंवा धावताना अतिशय सुंदर
दिसते. पूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या चित्त्याचे ते मुख्य भक्ष्य होते. शेगाव, परतवाडा,
अंबेजोगाई, नान्नज, हिप्परगा व कोडेकराई (तमिळ नाडू) अशा भिन्न परिसरांत मला
त्याचे दर्शन झाले आहे. हिप्परगा तलावा जवळ एक-एक करत अख्खा कळप जमा होताना दिसला.
परतवाडा व शेगावला शेतात, तर नान्नज व कोडेकराईला नैसर्गिक अधिवासात पाहिली. अंबेजोगाईतील
मुकुंदराज समाधी समोरच्या पठारावर आपल्या रंगसंगतीमुळे बेमालूमपणे वावरणाऱ्या
काळवीट माद्या बारकाईने निरखल्यावरच दिसल्या होत्या.
उष्णकटिबंधातील भारतीय उपखंडातच सापडत असल्याने ही प्रदेशनिष्ठ प्रजाती आहे.
देशात हिमालय, सह्याद्री व ईशान्ये कडील भाग सोडला तर बहुतांश राज्यांत जिथे माळराने
व गवताळ प्रदेश असलेली खुरटी शुष्क जंगले शिल्लक आहेत, तिथे काळवीट आढळतात. त्यांना
नियमितपणे पाणी लागते, ज्यासाठी ती बराच प्रवास करू शकतात. परंतु वाळवंटी भागात ती
आढळत नाहीत. उत्तर व वायव्य भारतात एक उपप्रजाती असून; मध्य, दक्षिण व आग्नेय
भारतात दुसरी आढळते. काळ्या व पांढऱ्या रंगसंगती मधील फरकांवरून त्या ओळखल्या
जातात. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खानदेशात विविध ठिकाणी काळवीटचा
आढळ आहे. पाकिस्तानात मोजक्या ठिकाणी, तर नेपाळ मध्ये एका ठिकाणी काळवीट सापडतात.
बांगलादेश मधून ती नष्ट झाली आहेत.
अँटीलोप सर्व्हिकाप्रा असे शास्त्रीय नाव असलेल्या काळवीटला ब्लॅकबक (इंग्रजी),
हरिण/मृग/कृष्णसार (संस्कृत व हिंदी), मूरुकू मार्न (तमिळ), हूला केर्रा/कृष्ण मृग
(कन्नड) व जिंका (तेलुगु) अशी अन्य नावे आहेत.
आकर्षक रूप
काळवीट मध्यम आकाराचे व दिसायला सुडौल असते. लांबून पाहिल्यास ते
चिंकारा या लहान आकाराच्या हरणासारखे दिसू शकते. माद्या व पिल्लांचा रंग पिवळट
तपकिरी असतो आणि पोटाकडील व पायाचा आतील भाग पांढरा असतो. नर तीन वर्षांचे झाले
की पाठीवरील त्वचा काळपट होते, तर पोटाखालचा भाग पांढराच राहतो. प्रौढ नरांची
पाठीवरील कातडी अधिक गडद असते. दक्षिणेकडे नरांची पाठ गडद काळपट तपकिरी, तर
उत्तरेकडे काळी असते. उन्हाळ्यात कातडीचा रंग फिकट होतो, तर पावसाळ्या नंतर ती गडद
व तुकतुकीत दिसते.
बुक ऑफ इंडियन अॅनिमल्स नुसार नर काळवीट खांद्या पाशी साधारण २ फूट ८ इंच उंच
असतो, तर वजन सरासरी ४० किलो भरते. शिंगांची लांबी दक्षिण भारतात साधारण २० इंच,
तर पश्चिम व उत्तरेत २०-२५ इंच असते. सारंग कुळातील हरणांप्रमाणे याची शिंगे दर
वर्षी गळून पडत नाहीत. एक वर्षाचे झाल्यावर नरांना शिंगांची टोके येतात, तर तीन
वर्षाचे झाल्यावर शिंगे पूर्ण मोठी होतात. विणीच्या काळात डौलदार नर डोकी व शिंगे
भिडवून झुंज देतानाचे दृश माळरानावर हमखास दिसते.
गवताळ प्रदेशात वास्तव्य
माळराना वरील परीसंस्थेतील काळवीट महत्वाचा घटक असून तेथील समतोल राखण्यात
त्याचे योगदान आहे. साधारण २०-३० च्या कळपाने काळवीट वावरतात. कळपाचे नेतृत्व
सामान्यपणे एका वयस्क व दक्ष मादी कडे असते. नर वेगळ्या कळपांत राहतात. उत्तर
भारतात काही शेच्या संख्येने काळवीट दिसल्याच्या नोंदी आहेत. अन्नाच्या उपलब्धते
नुसार कळपाची संख्या ठरते. विविध प्रकारचे गवत हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. कधीकधी
ते पाने व काही फळेही खातात. गवताच्या वाढीवर नियंत्रण व बीज प्रसार ही कामे
काळवीट करतात. चरायची वेळ सकाळ व संध्याकाळ असते, तर दुपारी ते सावलीत बसतात. काळवीट
रात्री संचार करत नाहीत.
काळवीटची ऐकण्याची क्षमता सर्वसाधारण असते, तर वास घेण्याची क्षमता चांगली
असते. दृष्टी विशेषतः उत्तम असते. मोकळ्या प्रदेशात शत्रूला हुडकून काढायला याचा
फायदा होतो. प्रचंड वेगाने पाळण्याची क्षमता (ताशी ८० किमी) हे त्याचे बचावाचे
महत्वाचे साधन आहे. माळरानावर फार धोका जाणवल्यास काळवीट खुरट्या जंगलांत शिरतात. चित्ता
नष्ट झाल्याने आता काळवीटची शिकार मुख्यत्वे लांडग्या कडून केली जाते. धोक्याची
सूचना मिळाल्यावर काळवीट जलद उड्या मारत पाळायला सुरवात करतात व लगेच वेग वाढवतात.
नवजात पिल्लांना माद्या गवतात लपवतात, पण ती पटकन पळायला सक्षम बनतात व लवकरच कळपात
सामील होतात.
ब्रिटीश काळात व त्यानंतर काळवीटांची पुष्कळ शिकार झाली, तशीच चित्ता व लांडगा
यांचीही झाली. पुढे चित्ता नष्ट झाला व लांडगे संख्येने कमी झाले. नैसर्गिक शत्रू
घटल्यावर काळवीटांची संख्या पुन्हा वाढू लागली. एकीकडे अधिवासही नष्ट होत गेला व
काळवीट अन्नासाठी शेतात घुसून प्रचंड उपद्रव करू लागले. याचा परिणाम असा झाला की शेतकरी
व काळवीट यांच्यात संघर्ष निर्माण झाला. पाळीव कुत्र्यांकडूनही लहान काळवीट मारली
जातात. मनुष्य वस्ती व आजूबाजूचा नैसर्गिक अधिवास यांच्यात संतुलन राखणाऱ्या
शाश्वत प्राचीन भारतीय जीवनशैलीत काळवीटाला संरक्षण मिळाले होते. याज्ञवल्क्य
स्मृतीत त्याचा उल्लेख आहे. आंध्रचा राज्य प्राणी असलेले काळवीट तेथील लेपक्षी
मंदिरावर कोरलेले दिसते. राजस्थानातील बिष्नोई समाज त्यांच्या संवर्धनासाठी
प्रसिद्ध आहे. या मुल्यांचा पुन्हा अंगीकार केला तर दख्खन पठारावर काळवीट एक
पर्यटक आकर्षण होऊ शकतील.
Comments