सोनेरी दिवस



हिवाळ्यात भरपूर पानगळ झाली,
त्यानंतर पालवीची नक्षी सजली.
       गळलेल्या पानांचा झाला वापर,
       वेचून घेई त्यांना कबुतर.
ग्रीष्मापूर्वी दाट हिरवी सावली,
वैशाख वणव्याची तीव्रता घटली.
       पिवळा गालीचा हा धरणीवर,
       सोन्याची फुले मस्तकावर.
पॉपकॉर्नसारखा फुलोरा डोले,
कुंचल्याचे जणू शिंतोडे ओले.
       बहावा याचा रंग सोबती,
       पांगारा खासा रान सोबती.
पंधरा दिवस राज्य गाजवी,
रस्त्यांवर आरास शोभे तेजस्वी.
       विषय आहे का छायाचित्राचा,
       लाडका आहे वृत्तपत्रांचा.
याच्या बियाही होती तयार,
तेव्हा कुठे गुलमोहर फुलणार.
       पाहुणा आग्नेय आशियातला,
       झालाय सखा गल्ली-गल्लीतला.
पण लोक करती छाटणी बेसुमार,
नष्ट करती पक्ष्यांचा आधार.
       इवलेसे रोप लावले तिठ्यावरी,
       भराभर वाढले गगनावरी.
कॉपरपॉड म्हणतात आंग्लभाषेत,
सोनमोहर आपल्या मातृभाषेत.
       निरंतर दिसतील दिवस सोनेरी,
       जर असेल हिरवाई भरजरी.

--- अतुल साठे
(© सर्व प्रकाशन हक्क लेखकाकडे – संपर्क atulsathe@yahoo.com)

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्य

मी अनुभवलेली महाराष्ट्रातील वन्यजीव विविधता

Spring time on Shilonda trail ..