दामभूमी ते परशुरामभूमी

वेग, धावपळ आणि गर्दी,
ही आपली दामभूमी मुंबई!
संवेदना, शांती आणि निसर्ग,
यांचा इथे नाही सांसर्ग.
इथेच सुरु होतो आपला प्रवास,
हवाहवासा वाटतो निसर्गाचा सहवास.
पृथ्वीने नेसली हिरवी पैठणी,
आशा वेळी साद घाली परशुरामभूमी.
दूरदूर पसरली भाताची शेती,
शोभती त्यांमध्ये बगळ्यांच्या जाती.
धावते जोरात परिवहनची बस,
खंड्या सांगे कवड्याला “तारेवर बस”.
सागाचा फुलोरा, नक्षी जणू सुंदर,
खळाळत वाहती स्वच्छ निर्झर.
झपझप सरती कौलारू घरे,
एकामागून एक, घाट आणि दरे.
रस्त्याला महिरप तेरड्याच्या फुलांची,
त्याला साथ रिमझिम पावसाची.
मेघांत हरवली गिरीशिखरे,
नागमोडी नद्यांचे हिरवे किनारे.
वळणावळणाच्या वाटेवर एक गाव छोटसं,
भोवती दाट आम्रबन त्याला साजेसं.
ऐन, पळस, बांबूची धीरगंभीर राई,
गाभाऱ्यात तेवते एक प्रसन्न समई.
जिंकले त्यांनी तपाने काम आणि काळ,
साधकाकरता होई तेजाची सकाळ.
उपभोगवादाने ग्रासलेले नगरवासी,
एकरूप होती या मुकलेल्या सुखासी.
या पावन देशी नको असली “प्रगती”,
त्याहून बहुमोल निसर्ग आणि नाती.
तुपाशी ही नको आणि उपाशी ही नको,
विहंगम दृश्य पाहात साक्षात्कार होतो.
मग रोजच घडेल हा प्रवास मनोमनी,
दामभूमी ते परशुरामभूमी!

-- अतुल साठे (© सर्व प्रकाशन हक्क लेखकाकडे - संपर्क atulsathe@yahoo.com )

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्य

मी अनुभवलेली महाराष्ट्रातील वन्यजीव विविधता

Spring time on Shilonda trail ..