जंगलेतर नैसर्गिक अधिवास.....
विविध प्रकारची जंगले हे भारताचे एक वैशिष्ठ्य आहे. मागच्या पोस्ट मध्ये आपण अशा काही जंगल अधिवासांचे फोटो पाहिले. आज घेऊया झलक महाराष्ट्रातील काही जंगलेत्तर अधिवासांची. जंगले तर महत्वाची आहेतच, पण अनेकदा लोकांचा असा समाज असतो की जंगल नसलेले ठिकाण हा महत्वाचा अधिवास असू शकत नाही. वास्तवात असे अधिवास सुद्धा किती वैविध्यपूर्ण व समृद्ध असतात याची थोडी माहिती घेऊया छायाचित्रांच्या माध्यमातून.
शेती (विशेषतः पारंपारिक शेती) हा एक अधिवास असतो. शेताच्या बांधावर असलेली झाडे अनेक प्रकारच्या पक्ष्यांना आकर्षित करतात. यातील अनेक पक्षी शेतावरील कीटकांना खाऊन शेतकऱ्याला मदत करतात. पारंपारिक शेतीत बांधावर कोणती झाडे लावावीत याचेही ज्ञान शेतकऱ्यांना असते. शिवाय बऱ्याचदा शेताला लागूनच जंगल किंवा अन्य नैसर्गिक अधिवास असतो ज्यामुळे शेत सुद्धा त्याचाच भाग बनते. वरील फोटो कोकण रेल्वेने प्रवास करताना चिपळूण व कुडाळ यांच्या दरम्यान कुठेतरी काढला आहे.
सामान्यपणे घनदाट झाडे असल्याशिवाय लोकांना एखादा प्रदेश जंगलाने आच्छादलेला आहे असे वाटत नाही. परंतु कमी पावसाच्या प्रदेशांत खुरटी किंवा काटेरी राने हा एक महत्वाचा अधिवास असतो. लांडगा, तरस, चिंकारा व बिबट्या सारखे अनेक प्राणी व पक्ष्यांचा तो अधिवास असतो. सदर फोटो अमरावती जवळच्या छत्री तलाव परिसरातील खुरट्या रानाचा असून त्यात खाटिक हा पक्षी बसलेला दिसत आहे.
भारतीय संस्कृति ही नेहेमीच निसर्ग उपासक परंपरा राहिलेली आहे हे आपण अनेकदा पाहिले. देवराई हे याचे एक सुंदर उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवाच्या अस्तित्वामुळे राखलेले रान. स्थल देवता किंवा ग्राम देवतेचे एक छोटेसे मंदिर देवराईत असते आणि स्थानिकांच्या श्रद्धेनुसार तेथील कोणतेही झाड किंवा वनस्पती तोडायची नसते. आजही काही प्रमाणात हा शाश्वत विचार शिल्लक असल्याने देवारायांत महाकाय वृक्ष पाहायला मिळतात. बहुतांश वेळेला देवराईत किंवा आसपास एखाद्या नदी किंवा ओढ्याचा उगम असतो. वरील छायाचित्रात रत्नागिरी जिल्ह्यातील कुडावळे देवराई दिसत आहे.
गवताळ प्रदेश किंवा माळरान हा कोरड्या प्रदेशांतील एक महत्वाचा अधिवास आहे. काळवीट, लांडगा, खोकड, नीलगाय, माळढोक यांसारख्या असंख्य पशु-पक्ष्यांचे ते आश्रयस्थान असते. कधी काळी भारतात चित्ता होता, तोही याच अधिवासात राहात असे. मैलोंमैल पसरलेले गवत व मध्येच काही झाडे असे हे दृश आपल्याला अफ्रिकेतील सवाना प्रदेशाची आठवण करून देते. सदर फोटो सोलापूर जवळच्या नान्नज अभयारण्यातील आहे.
दक्षिण कोकणात (साधारण मंडणगड पासून दक्षिणेला) पठारी भाग असतात ज्याला स्थानिक लोकं सडा असे म्हणतात. उन्हाळ्यात अतिशय ओसाड दिसणारे हे सडे पावसाळ्यात संपूर्ण कायापालट होऊन विविध वर्षाकालीन वनस्पतींनी भरून जातात. त्यावर विविध रंगांची व आकाराची लक्षावधी फुले येतात व बऱ्याच प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील कास सारख्या पठारांची आठवण करून देतात. वरील छायाचित्र दाभोळ जवळच्या एका सड्याचे आहे.
तलाव, नद्या व खाड्या असे पाणथळी अधिवास म्हणजे जमीन व पाणी यांचा संगम. अशा ठिकाणी पाणमांजर, मगर व मच्छीमार मांजर अशा प्राण्यांप्रमाणेच अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. हिवाळ्यात तर अशा पाणथळी म्हणजे थंड प्रदेशांतून भारतात आलेल्या पाहुण्या पक्ष्यांची पंढरी असते. वरील फोटो हा नाशिक जवळच्या नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील आहे.
समुद्र किनारे किंवा बीच आणि पर्यटक असे समीकरण झालेले आहे. कोकण व गोवा म्हणजे फक्त बीच असा एक सार्वत्रिक समज आहे.पण असे वालुकामय किनारे हे सुद्धा एक महत्वाचा अधिवास असतात. गल (समुद्रपक्षी) यांचे थवे हिवाळ्यात निर्जन किनाऱ्यांवर हमखास दिसतात. अनेक किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालतात व पुढे पिल्ले चालत समुद्रात जातात. वरील फोटो रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनाऱ्याचा आहे.अनेकदा बागायती व नैसर्गिक जंगले लागूनच असतात व जंगलातील अनेक पशु-पक्षी बागायती मध्ये सुद्धा आढळून येतात ज्यामध्ये त्यांना अन्नाचा सहज स्त्रोत सापडू शकतो. कोकणातील आंबा व नारळीच्या बागांत मी मलबार धनेश पाहिले आहेत. जंगले व नैसर्गिक अधिवासांचा समतोल राखून बागायती निर्माण केल्या तर अशा प्रकारे मानव-निसर्ग सहअस्तित्व अबाधित राहते. वरील फोटो रत्नागिरी जिल्ह्यातील आसूद गावातील सुपारीच्या बागेतील आहे.
Comments