दुर्गांच्या देशा .....

नमस्कार, आज महाराष्ट्र दिन! घेऊया एक सफर राज्यातील काही किल्ल्यांची. भटकंती दरम्यान काढलेली काही छायाचित्रं घेऊन जातील आपल्याला थेट शिवकाळात. सोबत अनुभवता येईल या गड-कोटांच्या आसपास असलेला निसर्ग.....

प्रतापगड - अफझलखानावर महाराजांनी मिळवलेल्या प्रचंड विजयाचा साक्षीदार! आपण पुस्तकांत वाचतो की प्रतापगड घनदाट जंगलाने वेढलेला आहे. सदर छायाचित्रात आसपासच्या दऱ्याखोऱ्यात बऱ्यापैकी शिल्लक असलेले जावळीचे जंगल दिसत आहे. चित्रात समोर महाबळेश्वर डोंगर रांग दिसत असून, उजव्या बाजूस आणखी पुढे गेले तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र सुरु होते...

मुख्य सह्याद्रीच्या पूर्वेकडे मराठवाडा व विदर्भच्या हद्दीवरून पसरत गेलेल्या कमी उंचीच्या अजिंठा उपरांगेतील तळटेकड्यांच्या बहुतांशी सपाट भागात असलेला प्राचीन देवगिरी किल्ला. सुमारे ७०० वर्षांपूर्वी अल्लाउद्दीन खिलजीने जिंकण्या आधी ही महाराष्ट्राची राजधानी होती. किल्ल्याच्या परिसरात पानझडी वृक्षांचे रान काही भागांत दिसते. सदर छायाचित्र माझ्या वडिलांनी काढले आहे.

चारी बाजूंनी समुद्राने वेढलेला व कलाल बांगडी सारख्या भयंकर तोफांनी रक्षिलेला असल्याने मराठा साम्राज्यात समाविष्ट न होऊ शकलेला मुरुडचा जंजिरा किल्ला. एके काळी कोळी राजांचा हा किल्ला सिद्दीने कपटाने जिंकला व इंग्रज येईपर्यंत अभेद्य राहिला. सदर छायाचित्रात किल्ल्यावरील तळे व मागे किनाऱ्यावरील दंडा-राजपुरीचा परिसर दिसत आहे.

सिद्दीच्या जंजीऱ्याला तोडीसतोड ठरेल असा सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला व शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतिक असलेला मालवणचा सिंधुदुर्ग. पश्चिम किनाऱ्यावर मराठ्यांच्या अभेद्य आरमाराला या किल्ल्याची मोलाची साथ होती. किल्ल्याच्या तटांवरुन खाली पाहिले असता नितळ स्वच्छ पाणी व काही ठिकाणी त्याचा तळही दिसतो.

विजयदुर्ग - देवगड तालुक्यातील किनाऱ्यावर स्वल्पविरामच्या आकाराचा हा प्राचीन जलदुर्ग महाराजांनी पुनर्रुजीवीत केला. या किल्ल्यापासून काही अंतरावर समुद्रात पाण्याखाली खडकांची एक नैसर्गिक भिंत आहे ज्यावर शत्रूची गाफील जहाजे आपटून जलसमाधी घेत....

वाई जवळच्या मेणवली गावात निसर्गरम्य कृष्णा काठच्या मंदिरांना लागून असलेल्या नाना फडणविसांच्या वाड्याची तटबंदी. स्वदेस सारख्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण याच नदीच्या घाटावर झाल्याचे आपल्याला आठवत असेल.

पुण्याच्या नैरुत्त्येस सुमारे २५ किमी वर असलेला सिंहगड उर्फ कोंढाणा. मुख्य सह्याद्री पासून पूर्वेकडे पसरत गेलेल्या एका उंच उपरांगेत असलेला कोंढाणा मध्ययुगीन पुण्याचा जणू रखवालदार होता. सदर छायाचित्रात डोंगर माथ्यावर सिंहगड व त्यावर दूरदर्शन मनोरा दिसत आहे. थंडी सरून गेल्यावर काढलेल्या या छायाचित्रात वृक्षांची पानगळ झाल्याने काही प्रमाणात असलेले जंगलही असून नसल्यासारखे भासत आहे.

गणपतीपुळे व गुहागर यांच्या मध्ये असलेला जयगड हा सागरावरील टेहेळणी साठी महत्वाचा होता. किल्ल्याच्या जवळच शास्त्री नदी समुद्राला मिळते. किल्ल्याची एक बाजू सोडली तर बाकी तीनही बाजूंना समुद्र, खाडी, जंगल व बागायती असे नयन मनोहर दृश्य दिसते.

मुख्य सह्याद्रीला समांतर व पश्चिमेकडे असलेल्या माथेरान डोंगर रांगेतील हा प्रबळगड किल्ला. माथेरानच्या सनसेट पॉइंट वरून काढलेल्या या छायाचित्रात प्रबळगडाचा डोंगर व त्याच्या उजवीकडे कलावंतीण सुळका दिसत आहे. मधल्या दरीत जंगल असून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाचे हे पाणलोट क्षेत्र आहे.

जय हिंद... जय महाराष्ट्र....

Comments

Unknown said…
Good info. There are many more like this within Maharashtra.

Popular posts from this blog

स्वातंत्र्य

मी अनुभवलेली महाराष्ट्रातील वन्यजीव विविधता

Spring time on Shilonda trail ..