हिरव्या वाटा....

मित्रहो, आपण सर्व स्थानबद्धतेत असल्यापासून प्रदूषण, वाहतूक व मानवी वर्दळ कमी झाल्याने अनेक वस्त्यांत व रस्त्यांवर, आसपासच्या नैसर्गिक अधिवासांत असलेले, पण सहसा न दिसणारे पशु-पक्षी दिसत असल्याच्या बातम्या व चित्रफिती पाहात असतो. असेही म्हटले जाते की या संकटातून मानवाने काहीतरी शिकावे व निसर्गाचा ऱ्हास या पुढे टाळता येईल तेवढा टाळावा, आपल्या नासाडी-प्रधान जीवनशैलीत बदल करून. असे केल्याने आपण निश्चितच हिरव्या वाटांनी पुढे जाऊ. आजच्या पुरते चला माझ्या बरोबर महाराष्ट्रातील काही हिरव्या वाटांवरून जिथे रस्त्याच्या दुतर्फा निसर्ग नेहेमीच खुणावत असतो.

पुण्यातील ARAI टेकडीवर जाणारी वाट सुरवातीला झोपडपट्टीतून जाते, परंतु माथ्याजवळ आलो की दोन्ही बाजूंना थोडे मानवनिर्मित व थोडे नैसर्गिक रान लागते. माथ्यावरील वाहनतळाला पोहोचण्यापूर्वी ही वाट अशी झोकदार वळण घेते...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग - सह्याद्रीच्या रांगांना बिलगून जाणारा एक दिमाखदार रस्ता. साहजिकच हा बांधताना बरेच जंगल तुटले. परंतु आजही बोर घाटाच्या अल्याड-पल्याड व प्रत्यक्ष घाटात बरेच जंगल दोन्ही बाजूंना दिसते (जर आपले डोळे भ्रमणध्वनीला खिळलेले नसतील तर)! खालापूर ते खंडाळा ते तळेगाव अशा पट्ट्यात आर्द्र पानझडी ते सदाहरित ते शुष्क पानझडी असा जंगलातील फरक जाणवतो.

चिपळूण व कराड यांना जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील हे ऐन पावसाळ्यातील दृश्य! या घाट रस्त्याचा बहुतांश भाग आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असून, हे छायाचित्र घेतले तेव्हा मलबार कस्तूर या सुंदर पक्ष्याची कर्णमधुर शीळ ऐकू येत होती.

नैसर्गिक जंगल व अमरायांतून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग (संगमेश्वर तालुका), चौपदरीकरणा पूर्वीचा. भविष्यात रुंदीकरण पूर्ण झाल्यावर बाजूचा उरलेला निसर्ग टिकून राहील अशी आशा नक्कीच करूया. कोकणातील निसर्गस्नेही जीवनशैली टिकली तर ही राने नक्कीच अबाधित राहतील.

क्षेत्र महाबळेश्वर मधील कृष्णाबाई मंदिराकडे जांभूळ व गेळा अशा सदाहरित वृक्षांच्या दाटीतून जाणारी पायवाट. संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा व आंध्रच्या काही भागाची तहान भागवणाऱ्या नद्या या ठिकाणी उगम पावतात आणि म्हणूनच ते पवित्र आहे.

माथेरान वरील सदाहरित जंगलातील मातीच्या रस्त्यावर ऊन-सावलीचा खेळ! हे छायाचित्र कदाचित माझ्या मेव्हण्याने काढलाय. सर्वच नगरांतील रस्ते काही अंशी तरी असे वाहन विरहित असतील तर.....!

दोडामार्ग तालुका, जिल्हा सिंधुदुर्ग येथील एक रस्ता. या तालुक्यातील जंगलांत वाघ, हत्ती, गवा, रानकुत्रा, अस्वल, सांबर, बिबट्या व शेकरू अशा प्राण्यांचा आढळ आहे. सदर जंगलाला संरक्षित दर्जा मिळावा म्हणून निसर्गप्रेमी व अभ्यासकांचे प्रयत्न सुरु आहेत.

बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मुंबई येथील तुळशी तलावाकडे जाणारा रस्ता. या रस्त्यावर बिबट्या, चितळ, सांबर, भेकर व लंगुर हे प्राणी दिसू / ऐकू येऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्य

मी अनुभवलेली महाराष्ट्रातील वन्यजीव विविधता

Spring time on Shilonda trail ..