Posts

Showing posts from November, 2011

माथ्यावरचं रान

मुंबईकरास खुणावती डोंगरवाटा हिरव्या, धकाधकीतून या थोडी सवड काढूया. नेरळ पासून पुढे चिमुकली आगगाडी, साद घालू लागे माथ्यावरची झाडी. नागमोडी वाटेवर सावरी आणि सागवान, पर्वत चढल्यावर दाट अंजनीचे रान. स्वागतास अंथरले लाल मातीचे गालिचे, संगतीस असती स्वर श्यामा पक्ष्याचे. नाही गोंगाट इथे कोणत्या वाहनांचा, निसर्ग घेई ताबा नकळत मनाचा. घोड्यांच्या टापांचा मधूनच आवाज, सोबतीला सळसळत्या पानांची गाज. शारलॉट तलाव दडलाय अरण्यात, बाजूच्या राईत ग्रामदैवत पिसारनाथ. जवळच असे बाजारपेठ टुमदार, रंगवलेले गवत व चिक्की चटकदार. निरनिराळ्या पॉइंटवरून विहंगम दृश्य, अनुभूती आनंदाची शांत अदृश्य. दूरवर शोभती प्रबळगड, इरशाळ, सुखद गारव्याची सुंदर सकाळ. दरीत पहुडला मोरबे जलाशय, कड्यावर तरंगत गरुड महाशय. चालता रानवाटा हात हाती धरून, मिळे मोकळा श्वास विचार मागे सारून. वनदेवतेचा एक रम्य अविष्कार, तरु-लतांनी नटलेले माथेरान पठार! --- अतुल साठे (© सर्व प्रकाशन हक्क लेखकाकडे - संपर्क atulsathe@yahoo.com )

लोकलच्या खिडकीतून....

शिवाजी टर्मिनसहून निघाली लोकल, विजेच्या वेगाने भायखळ्यात दाखल. गिरणगावातून पुढे अग्रेसर, स्वामीनारायणासमोर गाठले दादर. शहराची शीव ओलांडली दणाणत, कुर्ल्याला आभाळी विमाने लुकलुकत. उपनगरी वेध लागती घाटकोपरात, तुरळक झाडी खंडोबाच्या डोंगरात. लोहमार्गाच्या पूर्वेस सरस्वतीचा विहार, गोदरेजकारणे मग हिरवळ अपार. खारफुटी परिसर उगवतीच्या दिशेला, मुलुंडला रामराम मुंबईच्या वेशीला. पश्चिमेस शोभे येउर पर्वतराजी, तलावांचे शहर ओळख श्रीस्थानकाची. घालून वळसा पारसिक टेकडीला, नमस्कार माझा मुंब्र्याच्या देवीला. सुन्द्रीचे वन दिव्याच्या वाटेवर, बगळ्यांचे थवे खाडीच्या वाऱ्यावर. संस्कृती आगर जन्मगाव डोंबिवली, बायकोची ऑर्डर, “उतर, आलं ठाकुर्ली”. असा होतो प्रवास खिडकीतून बघत, जाताना सासुरवाडीला रमत गमत. --- अतुल साठे (© सर्व प्रकाशन हक्क लेखकाच्या हाती - संपर्क atulsathe@yahoo.com )