Posts

Showing posts from 2013

कळतंय पण वळत नाही

--- अतुल साठे निसर्गचक्रात बिघडलाय काही, हे कळतंय पण वळत नाही. विकासाची दिशा चुकतेय खरी, पण बदलण्याची नाही तयारी. शाश्वत जीवनशैली दिली सोडून, विवेक व नितीमत्ता खाली गाडून. वेदांनी सांगितले चार पुरुषार्थ, आम्हास हवे फक्त काम व अर्थ. धर्म व मोक्षाची कशाला बात? आम्ही करू निसर्गावर मात. संतुलन आधी ढळू देऊ, मग थोडी मलमपट्टी करू. विचित्र उपायांचा करू अवलंब, रामेश्वरी आग, सोमेश्वरी बंब. भूजल ऱ्हास दुष्काळाचे कारण, आमचा इलाज, मोट्ठे धरण. हवाय प्राचीन अरण्यांचं आवरण, करतोय वृक्षतोड, विलायती वनीकरण. वाढवाया हवा स्थानिक रोजगार, आणणार बाहेरील प्रकल्प चार. शहरांतील लोंढे रोखायला हवे, आम्हाला दिसतात मतदारांचे थवे. किरणोत्सर्गाला घालायचाय आवर, आम्ही उभारू मोबाईल टॉवर. रोखायला हवा वापर प्लास्टिकचा, काथ्याकूट करू किती मायक्रॉनचा. चंगळवाद पृथ्वीला नाही झेपणार, आम्ही फक्त जिडीपी वाढवणार. करावा कमी संसाधनांचा वापर, चालवणार एसी, अंघोळीला शॉवर. निसर्ग उपासक संस्कृति आपली, कर्कश फटाक्यांनी बिघडली दिवाळी. हवी सायकल व चालण्याची सवय, फ्रिवे व फ्लायओव्हर आम्ही ...

शिशिरातील दुपार

अतुल साठे सरत्या शिशिरातील शांत दुपार, कलत्या सूर्याची किरणे उबदार. हॉर्नबिल हाउसची दगडी इमारत, काम करताना हाती वाफाळता कप. अशा शुक्रवारी एकदा निघालो लवकर, वाऱ्याची झुळूक, स्वच्छ निळे अंबर. महोगनी व पिंपळ, पानांची सळसळ, सुट्टीची चाहूल, गर्दी तशी विरळ. सुवर्णपर्ण वृक्ष उन्हात न्याहाळत, काळाघोडापाशी आलो रमत-गमत. विद्यापीठ, न्यायालय दिमाखात उभे, रस्त्यापल्याड ओव्हल मैदान शोभे. लाल फळांनी नटले रानबदाम तरुवर, भरपूर पानगळ करती सोनमोहर. राजाभाई टॉवरचे ऐकू येती टोले, फांदीवरील खंड्या मजेत शीळ घाले. संध्याकाळच्या धावपळीला अजून असे अवकाश, रेल्वेच्या खिडकीत सहज बसलो सावकाश. अवचित लाभते असे स्वास्थ्य अपार, सुखावह अशी शिशिरातील दुपार. (© सर्व हक्क लेखकाकडे. संपर्क atulsathe@yahoo.com )