मी अनुभवलेली महाराष्ट्रातील वन्यजीव विविधता
दोडामार्ग तालुल्यातील आर्द्र पानझडी जंगल, जिल्हा सिंधुदुर्ग आज महाराष्ट्र दिन! नावातच महा असलेल्या या प्रदेशाला दैदिप्यमान असा सांस्कृतिक , ऐतिहासिक , साहित्यिक , औद्योगिक व आध्यात्मिक वारसा लाभला आहे. भारताच्या जडणघडणीत बहुतांश क्षेत्रांत मोलाची कामगिरी महाराष्ट्राकडून होत आलेली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात नैसर्गिक संपत्ती सुद्धा विपुल व वैविध्यपूर्ण आहे. पूर्वी याही पेक्षा समृद्ध नैसर्गिक ठेवा इथे अस्तित्वात होता असे जुनी सरकारी राजपत्र किंवा शास्त्रीय अभ्यासकांच्या नोंदी चाळल्या तर लक्षात येते. आजही शिल्लक असलेल्या नैसर्गिक अधिवासांत जैवविविधता विलक्षण आहे. गेल्या दोन दशकांत केलेल्या भटकंतीत अनुभवलेल्या वन्यजीवनाचा पट तुमच्यासमोर मी काढलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून मांडतोय. वन्यप्राण्यांची काही छायाचित्रे जिथे उल्लेख केलाय तेथीलच असतील असे नाही. चितळ किंवा कांचनमृग - जगातील सर्वात शोभिवंत समजले जाणारे हरीण, जे फक्त भारतीय उपखंडातच आढळते! मला याचे दर्शन बोरीवली, गोरेगाव, मेळघाट व ताडोबा अशा विविध ठिकाणी झाले आहे. सर्वात लक्षात राही...